Monday, October 18, 2010

विश्वरूपका सद्‍गुरुनाथा

श्री जगदंबा प्रसन्न

विश्वरूपका सद्‍गुरुनाथा वंदन करतो तुला ।
दावि तव अद्‍भुत शक्ति मला ॥
ज्या शक्तिने विश्व पाळुनी अलिप्त अससी भला ।
पाहु दे सगुण रूप ते मला ॥ धृ ॥

वर्णिली ऋषिंनी श्रृति पुराणांतरी ।
स्तवियेली संकटी थोर थोर सुरवरी ॥
त्या शक्ति वाचुनि ब्रह्म काय ते करी ।
सप्तशती ग्रंथामाझारी ब्रह्मदेव बोलिला ॥
ऐकुनी मार्कंडेय तोषला ॥ १ ॥

निर्गुण निरुपम नित्य निरामय सगुण रुपासी आला ।
तीच ही ॐकार रूपी लिला ॥
प्रथम पीठ "अ" कार नांदे तुळजापुरी ।
द्वितीय पीठ "ऊ" कार शोभे कोल्हापुरी ।
तृतीय पीठ स्थापित "म" कार गड माहुरी ।
अर्ध पीठ त्या अर्ध मातृकेवरी शुन्यी राहिला ।
वंदिते सप्तशृंगी जननीला ॥२॥

सगुण रुपाचे वर्णन करण्या गुरुनाथ पुढे जाहला ।
मागुनी अज्ञदास चालिला ॥
पायी तोडर नुपूरे चरण-भूषणे बरी ।
नभ नक्षत्रे येवुनी राहिली नखाग्रावरी ।
कुंकुम मंडित शोभती चरणकमले साजिरी ।
गुरु कृपेने या चरणांचा आश्रय ज्या लाभला ।
तोच तो धन्य जगी जाहला ॥३॥

शोभे पितांबर दिव्य अमोलिक रक्तवर्ण भासला ।
जरीचा पदर कटी खोविला ॥
वसन घोळ जरीचा लोळे चरणावरी ।
शोभती सज्जिल्या नि कामिकावरी
दिव्य कमरपट्टा चमके कमरेवरी ।
मातेच्या स्तनी अमृत भरले लाभ जया जाहला ।
धन्य रे धन्य गुरुच्या मुला ॥४॥

हिरवी कंचुकी लेऊनी अंगी वक्षभाग झाकला ।
भुजावरी जरीकाठ शोभला ॥
पुतळ्यांची माळ चंद्रहार वरती सरी ।
शोभतो ठुशीवरती साज कोल्हापुरी ।
मोहनमाळ चमके चिंचपेटी साजिरी ।
कंठभूषणी मंगलसूत्रे कंठ बहु शोभला ।
तन्मणी मौक्तिकांत गुंफिला ॥५॥

हरित कंकणे गोठ पाटल्या वर तोडा शोभला ।
तळहाती लाल रंग भासला ॥
बाजुबंद वेळा चमके बा वरी ।
कुरुळ केश मृदु रुळताती स्कंधावरी ।
ती दिव्य कुंडले कर्णी शोभली बरी ।
अष्टादशभुजी दैत्य मर्दना आयुध भार शोभला ।
पाहता जीव थकित जाहला ॥६॥

पाशुपत अग्नी अस्त्र डमरु भाला त्रिशुळ चमकला ।
कमंडलु पांचजन्य मिरविला ।
खड्‍ग ढाल शोभे धनुष्य बाणावरी ।
शापादपी नागास्त्र मालिका त्यावरी ।
गदा पद्म दैत्यशीर लोंबे एक्या करी ।
दिव्य सुदर्शन घेऊनी हाती दैत्यभार मारिला ।
सुरवरी आनंद बहु जाहला ॥७॥

गुलाबी लाली हनुवटीवरी हरित बिंदु गोंदिला ।
भृकुटीमध्ये चंद्राकृति रेखीला ।
नासिका सरळ ती सर्जी नथ साजिरी ।
मुख लाल शोभे कमल नेत्र त्या परी ।
कुंकुम मळवट मिरवे त्या भृकुटिच्या वरी ।
झगमग झगमग प्रभा फाकली मुगुट शोरी शोभला ।
मौक्तिकी तुरा वरी खोविला ॥८॥

मम माऊलीचे दिव्य रूप ते मोद मनी जाहला ।
बाळ हा चरणावरी लोळला ।
क्षालुनी चरण गंध पुष्प अर्पी वरी ।
अष्टादशभुजी लाविली उटी केशरी ।
कुंकुम हरीद्रा रेखित भाला वरी ।
अत्तर गुलाब शिंपुनी अंगी पुष्पहार घातिला ।
जरीचा शेला पांघरविला ॥९॥

धूप दीप दावुनी समर्पी दुग्ध जगज्जननीला ।
त्रयोदश गुणि विडा अर्पिला ॥
ओवाळि आरती मंत्र पुष्प घे करी ।
वेद घोष करुनी समर्पी मातेशिरी ।
सव्य घेऊनी ये वंदी चरणावरी ।
साष्टांगे प्रणिपात करितसे अष्टभाव दाटला ।
जननीने प्रेमे कुरवाळिला ॥१०॥

हे मम माऊली निर्गुण ब्रह्मी ॐ ध्वनी जाहला ।
तीच तू विश्वस्वरूपी लिला ॥
ब्रह्म आणि माया अलिप्त नससी खरी ।
हे ज्ञान अंतरी प्रगटो दे लवकरी ।
गुरुप्रेम सुख वाढो शुक्लेंदु परी ।
गुरु कार्यासी साह्य असावे कृपा दान दे मला ।
जननी पाहिजे हेतु पुरविला ॥११॥

हास्य मुखाने बोले माता भार आम्ही घेतला ।
कासया चिंता व्हावी तुला ॥
दिनानाथ गुरु कार्यभाग स्वागे करी ।
बाह्यदृष्टी पाहता नाममात्र तुं हरी ।
काम पूरीत हो विश्वास वचनीं ह्या धरी ।
गुप्रेमाचा ठेवा लाभो पूर्णपणे बा तुला ।
ज्ञान मग दूर कुठे रे मुला ॥१२॥

या स्तोत्राचा ध्यानयुक्त जो पाठ करु लागला ।
तयाचा भार आम्ही वाहिला ॥
हे वचन बोलुनी कुरवाळी मुख करी ।
प्रगटे हृदयमंदिरी बैसुनी सिंहावरी ।
गुरुस्वरूपी झाली ऐक्यरूप ती खरी ।
सद्‍गुरु दासा गुरुकृपेने आनंद बहु जाहला ।
धन्य गुरु वुठामाईची लिला ॥१३॥

द्वारा - श्री ॐ हरिनाथ गुरु दिनानाथ सेवेकरी (मा. हरिभाऊ, मु. पो. मुखेड, ता. येवला. जि. नासिक)




श्रीनाथ स्तवन

॥ ॐ दिनानाथ गुरुमाऊली ॥

श्रीनाथ स्तवन

येई येई येई येई माझ्या नाथराया ।
तुझ्या चरणकमलावरुनी कुरवंशली काया ॥
काय पूर्वपुण्यठेवा आजी फळा आला ।
परब्रह्म सद्‍गुरु माझ्या सदनासी आला ॥
भक्तकामकल्पद्रूम होसी दिनानाथा ।
नको पाहू गुण दोष तारी या अनाथा ॥
विठामाई माऊलीची धरियेली कास ।
म्हणुनी हा मार्ग झाला सुलभ आम्हास ॥
सद्‍गुरुदास परमानंदे चरणी ठेवी माथा ।
पुरवावा मनीचा हेत सख्या दिनानाथा ॥
(हे अत्यंत प्रेमपूर्ण व आर्तता असलेले नाथस्तवन श्री ॐ हरिनाथ गुरु दिनानाथ सेवेकरी (मा. हरिभाऊ, मु. पो. मुखेड, ता. येवला. जि. नासिक) यांनी श्रींच्या कृपेने तयार केलेले आहे. आपल्याकडे कोणत्याही आनंदमय उत्सवप्रसंगी, मंगलप्रसंगी उदा. श्रीगणेशाअगमन, गौरी आगमन, दसरा वगैरे आनंदमय प्रसंगी आपल्या सद्‍गुरुला आवाहन करण्याकरता अतिशय योग्य व प्रासादिक असे आहे. भाविकांनी यचा जरूर लाभ घ्यावा.)

Sunday, October 17, 2010

श्री माई महाराजांची आरती

श्रीराम
जयदेव जयदेव जयसद्‍गुरु माई।
परिपूर्ण झालांत जीवनाठाई ॥धृ॥

जमखंडी ग्रामी कर्नाटक देशी
जन्म झालासे आपटे कुलवंशी
उमदीशानुग्रह तुम्हा लाभला बाल्यदशी
अखंड साधन योगे साधिले गुरुपदासी ॥१॥

सद्‍गुरु कृपेने तरला खडतर संसारी
नामामृत देऊन तारिले अनेक संसारी
एकोणिशे त्र्याऐंशी साली नरसिंह जयंतीसी
निजानंदी राहुनी पूर्ण केले अवतारासी ॥२॥

नित्य साधन करुनी तव शिष्यगण
आठवुनी तवस्वरूप होती उन्मन
सबीज नाम घेऊनी सद्‍भावांजली ही
अर्पियली दत्तात्रेय सद्‍गुरु चरणी ॥३॥

द्वारा - श्री दत्तात्रेय रामचंद्र फडके , पनवेल