विश्वरूपका सद्गुरुनाथा वंदन करतो तुला ।
दावि तव अद्भुत शक्ति मला ॥
ज्या शक्तिने विश्व पाळुनी अलिप्त अससी भला ।
पाहु दे सगुण रूप ते मला ॥ धृ ॥
वर्णिली ऋषिंनी श्रृति पुराणांतरी ।
स्तवियेली संकटी थोर थोर सुरवरी ॥
त्या शक्ति वाचुनि ब्रह्म काय ते करी ।
सप्तशती ग्रंथामाझारी ब्रह्मदेव बोलिला ॥
ऐकुनी मार्कंडेय तोषला ॥ १ ॥
निर्गुण निरुपम नित्य निरामय सगुण रुपासी आला ।
तीच ही ॐकार रूपी लिला ॥
प्रथम पीठ "अ" कार नांदे तुळजापुरी ।
द्वितीय पीठ "ऊ" कार शोभे कोल्हापुरी ।
तृतीय पीठ स्थापित "म" कार गड माहुरी ।
अर्ध पीठ त्या अर्ध मातृकेवरी शुन्यी राहिला ।
वंदिते सप्तशृंगी जननीला ॥२॥
सगुण रुपाचे वर्णन करण्या गुरुनाथ पुढे जाहला ।
मागुनी अज्ञदास चालिला ॥
पायी तोडर नुपूरे चरण-भूषणे बरी ।
नभ नक्षत्रे येवुनी राहिली नखाग्रावरी ।
कुंकुम मंडित शोभती चरणकमले साजिरी ।
गुरु कृपेने या चरणांचा आश्रय ज्या लाभला ।
तोच तो धन्य जगी जाहला ॥३॥
शोभे पितांबर दिव्य अमोलिक रक्तवर्ण भासला ।
जरीचा पदर कटी खोविला ॥
वसन घोळ जरीचा लोळे चरणावरी ।
शोभती सज्जिल्या नि कामिकावरी
दिव्य कमरपट्टा चमके कमरेवरी ।
मातेच्या स्तनी अमृत भरले लाभ जया जाहला ।
धन्य रे धन्य गुरुच्या मुला ॥४॥
हिरवी कंचुकी लेऊनी अंगी वक्षभाग झाकला ।
भुजावरी जरीकाठ शोभला ॥
पुतळ्यांची माळ चंद्रहार वरती सरी ।
शोभतो ठुशीवरती साज कोल्हापुरी ।
मोहनमाळ चमके चिंचपेटी साजिरी ।
कंठभूषणी मंगलसूत्रे कंठ बहु शोभला ।
तन्मणी मौक्तिकांत गुंफिला ॥५॥
हरित कंकणे गोठ पाटल्या वर तोडा शोभला ।
तळहाती लाल रंग भासला ॥
बाजुबंद वेळा चमके बा वरी ।
कुरुळ केश मृदु रुळताती स्कंधावरी ।
ती दिव्य कुंडले कर्णी शोभली बरी ।
अष्टादशभुजी दैत्य मर्दना आयुध भार शोभला ।
पाहता जीव थकित जाहला ॥६॥
पाशुपत अग्नी अस्त्र डमरु भाला त्रिशुळ चमकला ।
कमंडलु पांचजन्य मिरविला ।
खड्ग ढाल शोभे धनुष्य बाणावरी ।
शापादपी नागास्त्र मालिका त्यावरी ।
गदा पद्म दैत्यशीर लोंबे एक्या करी ।
दिव्य सुदर्शन घेऊनी हाती दैत्यभार मारिला ।
सुरवरी आनंद बहु जाहला ॥७॥
गुलाबी लाली हनुवटीवरी हरित बिंदु गोंदिला ।
भृकुटीमध्ये चंद्राकृति रेखीला ।
नासिका सरळ ती सर्जी नथ साजिरी ।
मुख लाल शोभे कमल नेत्र त्या परी ।
कुंकुम मळवट मिरवे त्या भृकुटिच्या वरी ।
झगमग झगमग प्रभा फाकली मुगुट शोरी शोभला ।
मौक्तिकी तुरा वरी खोविला ॥८॥
मम माऊलीचे दिव्य रूप ते मोद मनी जाहला ।
बाळ हा चरणावरी लोळला ।
क्षालुनी चरण गंध पुष्प अर्पी वरी ।
अष्टादशभुजी लाविली उटी केशरी ।
कुंकुम हरीद्रा रेखित भाला वरी ।
अत्तर गुलाब शिंपुनी अंगी पुष्पहार घातिला ।
जरीचा शेला पांघरविला ॥९॥
धूप दीप दावुनी समर्पी दुग्ध जगज्जननीला ।
त्रयोदश गुणि विडा अर्पिला ॥
ओवाळि आरती मंत्र पुष्प घे करी ।
वेद घोष करुनी समर्पी मातेशिरी ।
सव्य घेऊनी ये वंदी चरणावरी ।
साष्टांगे प्रणिपात करितसे अष्टभाव दाटला ।
जननीने प्रेमे कुरवाळिला ॥१०॥
हे मम माऊली निर्गुण ब्रह्मी ॐ ध्वनी जाहला ।
तीच तू विश्वस्वरूपी लिला ॥
ब्रह्म आणि माया अलिप्त नससी खरी ।
हे ज्ञान अंतरी प्रगटो दे लवकरी ।
गुरुप्रेम सुख वाढो शुक्लेंदु परी ।
गुरु कार्यासी साह्य असावे कृपा दान दे मला ।
जननी पाहिजे हेतु पुरविला ॥११॥
हास्य मुखाने बोले माता भार आम्ही घेतला ।
कासया चिंता व्हावी तुला ॥
दिनानाथ गुरु कार्यभाग स्वागे करी ।
बाह्यदृष्टी पाहता नाममात्र तुं हरी ।
काम पूरीत हो विश्वास वचनीं ह्या धरी ।
गुप्रेमाचा ठेवा लाभो पूर्णपणे बा तुला ।
ज्ञान मग दूर कुठे रे मुला ॥१२॥
या स्तोत्राचा ध्यानयुक्त जो पाठ करु लागला ।
तयाचा भार आम्ही वाहिला ॥
हे वचन बोलुनी कुरवाळी मुख करी ।
प्रगटे हृदयमंदिरी बैसुनी सिंहावरी ।
गुरुस्वरूपी झाली ऐक्यरूप ती खरी ।
सद्गुरु दासा गुरुकृपेने आनंद बहु जाहला ।
धन्य गुरु वुठामाईची लिला ॥१३॥
द्वारा - श्री ॐ हरिनाथ गुरु दिनानाथ सेवेकरी (मा. हरिभाऊ, मु. पो. मुखेड, ता. येवला. जि. नासिक)
No comments:
Post a Comment