Sunday, June 26, 2011

नामस्मरण भक्ति

॥ श्रीराम ॥
मागां निरोपिले कीर्तन । जे सकळांस करी पावन । आतां ऐका विष्णोस्मरण तिसरी भक्ती ॥१॥
स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें । नामस्मरणें पावावें । समाधान ॥२॥
नित्य नेम प्रातःकाळी । माध्यानकाळी सायंकाळी । नामस्मरण सर्वकाळी । करीत जावें ॥३॥
सुखदुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥४॥
हरुषकाळी विषमकाळी । पर्वकाळी प्रस्तावकाळीं । विश्रांतिकाळी निद्राकाळी । नामस्मरण करावें ॥५॥
कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट । आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥६॥
चालतां बोलतां धंदा करितां ।खातां जेविता सुखी होतां । नाना उपभोग भोगितां नाम विसरों नये ॥७॥
संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती । सांडु च नये ॥८॥
वैभव सामर्थ्य आणि सत्ता । नाना पदार्थ चालतां । उत्कट भग्याश्री भोगितां । नामस्मरण सांडू नये ॥९॥
आधी अवदसा मग दसा । अथवा दसेउपरी अवदसा । प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडुं नये ॥१०॥
नामें संकटे नासतीं । नामें विघ्नें निवारती । नामस्मरणें पाविजेती । उत्तम पदें ॥११॥
भूत पिशाच्च नाना छंद । ब्रह्मगिरहो ब्राह्मणसमंध । मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठें नासती ॥१२॥
नामें विषबाधा हरती । नामें चेडेचेटकें नासती । नामें होये उत्तम गती । अंतकाळी ॥१३॥
बाळपणीं तारुण्यकाळीं । कठिणकाळीं वृध्दाप्यकाळीं । सर्वकाळी अंतकाळी। नामस्मरण असावें ॥१४॥
नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेशी विश्वेश्वर । वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनामेंकरूनी ॥१५॥
उफराट्या नामासाठीं । वाल्मीक तरला उठाउठीं । भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥१६॥
हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातांपासुन सुटला । नारायणनामें पावन झाला । अजामेळ ॥१७॥
नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उध्दरले । महापापी तेचि झाले । परमपवित्र ॥१८॥
परमेश्वराची अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें । नामस्मरण करता यमें । बाधिजेना ॥१९॥
सहस्रनामामधें कोणीयेक । म्हणतां होतसे सार्थक । नाम स्मरतां पुण्यश्लोक । होईजे स्वयें ॥२०॥
कांहिंच न करूनि प्राणि । रामनाम जपे वाणी । तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तालागीं सांभाळी ॥२१॥
नाम स्मरे निरंतर । ते जाणावें पुण्यशरीर । महादोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥२२॥
अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उध्दरला । हळहळापासुन सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥२३॥
चहुं वर्णा नामाधिकार । नामीं नाही लहानथोर । जड मूढ पैलपार । पावती नामें ॥२४॥
म्हणौन नाम अखंड स्मरावें । रूप मनी आठवावें । तिसरी भक्ती स्वभावें निरोपिली ॥२५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादें नामस्मरण भक्तिनाम समास तिसरा ॥



No comments: